
Project Asmi
An Initiative by Dr. Kalpana Vyavahare Foundation

Vaishali Vyawahare Deshpande
Director
डाॅ. कल्पना व्यवहारे फाउंडेशन अंतर्गत 'प्रोजेक्ट अस्मि' हा प्रकल्प मुलांच्या भावनिक व मानसिक विकासासाठी हसतखेळत काम करायचं या उद्देशाने सुरू केला. अगदी ठरवूनच तो आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल मुलांच्या शाळांमधून राबवण्याचा निर्णय घेतला.
मी मानसतज्ञ असल्यामुळे समुपदेशन करताना सातत्याने विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडवत होते. अभ्यासात लक्ष न लागणं, टोकाचा राग येणं, छोट्या छोट्या गोष्टींवर हिंसक प्रतिक्रिया देणं, खोटं बोलणं, सतत ताणाखाली असणं, पीयर प्रेशर, कुमारवयातलं लैंगिक आकर्षण, स्वतःबद्दलच्या अवास्तव अपेक्षा, प्रचंड अस्वस्थता, भीती असे अनेक प्रश्न अकारण वाढले आहेत असं जाणवत होतं. महाविद्यालयीन तरुणांमधील नैराश्य आणि आत्महत्येचे प्रयत्न हे शालेय जीवनातले प्रश्न वेळेवर आणि योग्य पद्धतीने हाताळले न गेल्यामुळे वाढत आहेत हेही लक्षात येत होतं.
आपली मुलं अभ्यासात हुशार आहेत, शाळांमधे पण अभ्यासाकडे ( निकालाकडे ) खूपच जास्त लक्ष दिलं जातं पण त्याबरोबरीने मुलांच्या भावनिक विकासाकडे दिलं जात नाही. त्यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती अतिशय उत्तम दिसते पण स्वतःच्या भावनांवर नियंत्रण, सामाजिक समायोजन यात ते कमी पडतात. त्यामुळे उद्भवणार्या समस्यांची खूप मोठी यादी आपल्याला सहज करता येईल. समस्यांवर लक्ष केंद्रित केलं तर खापर फोडायला अनेक मुद्दे मिळतील... दोषपूर्ण शिक्षण पद्धती, बदलती कुटूंब व्यवस्था, स्पर्धा, भौतिक सुखसुविधा- पैसा हेच जीवन जगण्याचे ध्येय मानणं, सुमार माध्यमांचा प्रचंड प्रभाव...... पण ही अशी कारणं शोधत बसण्यापेक्षा त्यावर उपाय काय करता येतील? असा विचार करत गेले आणि मग जे सुचलं तेच 'प्रोजेक्ट अस्मि'. अस्मि चा अर्थ'मी आहे' म्हणजे स्वतःचा स्वीकार.
मी कशी/कसा आहे हे समजणं आणि मी जशी/जसा आहे तसा स्वतःचा स्वीकार करणं हा अनेक समस्यांवरचा उपाय आहे.
हाच उपाय करायचा आणि तोही अगदी लहान वयापासून अगदी सातत्यानं , इयत्ता पहिली ते दहावी अशी दहा वर्ष.
प्रोजेक्ट अस्मि हेच करतंय आणि त्याचा परिणाम दिसायला लागला आहे.